मुलगी शिकली प्रगती झाली हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. 1848 मध्ये जोतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना सुशिक्षित करून त्यांना ती चालवायला दिली. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो.एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. शिक्षण स्त्री उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे. मुलांना शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे. एक आई म्हणून आपल्या मुलांचा जसा अभ्यास घेईल तसा कोणत्याही शिकवणी वर्गात घेतला जाऊ शकत नाही. कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगले वागणे, सच्चेपणा,प्रामाणिकपणा,प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळे मानवात खूप मोठय़ा प्रमाणावर बदल झाले आहेत.शिक्षण घेतल्यामुळे मानवाला हक्काचे महत्व समजते. आजच्या काळात पैसा, संपत्ती याला महत्त्व दिले गेले आहे. सुशिक्षित व्यक्ती आपल्या आवडी-निवडी आपले हक्क होत असलेला भ्रष्टाचार थांबवू शकतात.सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले यांनी स्त्रीयांना शिक्षण देण्यासाठी मोठ-मोठया अडचणीना घेतल्यामुळे स्त्रिया आपल्या पायावर उभ्या आहेत.
आजच्या काळात कोणत्याही पदावर जायचे असेल तर कोणतेही काम करायचे असेल तर व्यक्तीचे शिक्षण विचारात घेतले जाते.आजच्या काळात जर मान-संपत्ती मिळवायची असेल तर पहिले त्या व्यक्तीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. आज शिक्षणाला संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेले आहे. गावाकडे महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही. ग्रामीण भागात मुलीचे शिक्षण असो की महिलांचे सक्षमीकरण आपल्याकडे परिस्थिती तेवढी चांगली नाही. मुलीचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे हे समाजाने ओळखायला हवे. महिलांवर होणारे अन्याय महिलांनी सक्षमरित्या सामना करून सोडविले पाहिजेत.शक्ती ही महिलांमध्ये शिक्षणामुळे येऊ शकते. शिक्षण घेतल्याने आपल्या जीवनाला एक दिशा मिळते. मुलगी शिकून काय करणार? ही पालकांची भावना अजूनही दूर झालेली नाही. घराबाहेर जाणे दूरची गोष्ट हिंदुस्तान स्वतंत्र झाला त्या वेळी देशासमोर निरक्षरता फार मोठी समस्या होती. आज समाजात शिक्षणामुळे नवनवीन शोध लागले आहेत. समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा नाहीशी झाली. आज सरकारने 18 वर्षाखालील मुलांना शिक्षण देणे सक्तीचे केले आहे. सरकारने प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार दिला आहे.
Tuesday, September 10, 2019
स्त्री शिक्षणाचे महत्त्व
माझी शाळा
माझी शाळा म्हणजे आदर्श विद्यालय बोंळिज. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो एक आई, परिसर,शाळा.वाढताना आपण जास्तीत जास्त वेळ शाळेतच घालवला. मला शाळेत जायला खूप आवडायचे.शाळेत घालवलेले एक-एक क्षण अजूनही आठवतात. शाळेची काय मज्जाच वेगळी होती. आपल्याला शिस्त ही शाळेने शिकवली. शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते काही वेगळेच होते. सगळे लहान असताना शाळेत जायला रडायचे मात्र मी न चुकता रोज शाळेत जायची.मला शाळेची खूप आवड होती. शाळेत मित्र-मैत्रिणी सोबत मारलेल्या गप्पा, एकमेकांबरोबर खाल्लेला डब्बा अजूनही स्मरणात आहे. पूर्वी शाळेत खूप मज्जा यायची. मैत्रिणीसोबत केलेली मस्ती काही वेगळीच होती. कसे हे 10वीचे वर्ष संपले काही कळालेच नाही. मन भरून येते खरंच मित्रांनो शाळेची ओळख काही वेगळीच असते. मला अजूनही शाळेचा एक एक क्षण हवाहवासा वाटतो. शाळेत परत जावेसे वाटते जसे शाळेत वातावरण होते तसे वातावरण कुठेच नाही. शाळेत मित्र-मैत्रिणीच्या सहवासात राहणे, शिक्षकांशी आपुलकीचे नाते काही वेगळेच होते. शाळेचे दिवस कसे निघून गेले समजलेच नाही. परत लहान व्हावेसे वाटते. आपण का इतके मोठे झाले? मला माझ्या शाळेचा खूप अभिमान वाटतो.शाळेचे चित्र डोळ्यासमोर येतेय.शाळेत परिक्षा आली की सगळ्यांची अभ्यासाची सुरुवात.पेपर संपले की परत बर वाटायचं. पेपर असले की सगळे प्रामाणिकपणे अभ्यास करायचे. सगळ्यांमध्ये स्पर्धाच सुरू कोणी किती अभ्यास करतो कोणाला जास्त गुण मिळणार याची वाटच पाहत असतात. शाळेसाठी जितक लिहाव तितके शब्दच अपुरे आहेत. शाळेचे दिवस संपले की असे वाटते जणू काही आयुष्यच संपले आहे. जीवनाचा प्रवाह थांबला आहे. क्षणभर विश्रांतीच घेतली आहे. शाळेसारखे मार्गदर्शन महाविद्यालयात मिळत नाही. शाळेनंतर स्वःतचे निर्णय घ्यायला आपण मोकळे झाले. कोणीही मार्गदर्शन करायला नसते. आपली प्रगतीची दिशा आपणच निवडायची. 10वीचे वर्ष संपल्यानंतर माझा शाळेशी संपर्क संपला.
विश्रांतीच घेतली आहे. शाळेसारखे मार्गदर्शन महाविद्यालयात मिळत नाही. शाळेनंतर स्वःतचे निर्णय घ्यायला आपण मोकळे झाले. कोणीही मार्गदर्शन करायला नसते. आपली प्रगतीची दिशा आपणच निवडायची. 10वीचे वर्ष संपल्यानंतर माझा शाळेशी संपर्क संपला.
निसर्ग
निसर्ग आणि आपले नाते अतूट आहे.निसर्गाच्या छायेत आपण सतत वावरत असतो. पाऊस,झाड,पक्षी,समुद्र आकाश यांची ओढ मनाला वाटते. आपण एकटे नाही असे जाणवते. निसर्गाच्या आणि माणसाच्या जन्मापासून निमार्ण झालेला नात्याचा प्रवास विलक्षण आहे. मला निसर्गात रमायला खूप आवडते. इवली इवली रानफुले, रानवारा,फांदयात गुंतलेली झाडे ही सगळी निसर्गाची स्मृतिचित्रे मनात गडद झालेली आहे. पिंपळ, वड, गुलमोहर, चिंच, चाफा अशा कितीतरी झाडांना आपण ओळखत असतो. झाडे आपल्याशी बोलत नाही पण त्यांचे तन आणि मन फळाफुलांनी बहरून आलेले असते. झाडांशी आपले नाते जवळकीचे असते. आपला स्पर्श,आपल्या जाणिवा झाडांना कळत असतात. झाड फुलांनी बहरून आले की आपणही बहरून येत असतो. आंब्याला मोहर आला की रान सुंगधाने बहरून जाते.जंगलातून फिरताना झाडांच्या सावल्यांमध्ये हरवून जाणाऱ्या आपल्या सावल्या आपल्यालाच ओळखता येत नाही. निसर्गातील वातावरण किती सुंदर आहे. निसर्गातून खूप काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे. जर निसर्गच नसता तर आपल्याला काही निसर्गाच नाते अनुभवायला मिळाले नसते. निसर्ग मला माणसापेक्षा जवळचा सोबती वाटतो. निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो ते घ्यायला आपले दोन इवले हात अपुरे पडतात. काहींनी आपले संपूर्ण जीवन निसर्गाच्या सानिध्यात घालवले. निसर्गाने आपल्या मानव जातीला जन्म दिला आहे संगोपन केले आहे. आपण किती नशीबवान आहेत की आपला जन्म गावात झाला. निसर्ग खरंच आपला मित्र आहे.
भ्रष्टाचार
भ्रष्टाचार ही मानवी समाजाला लागलेली कीड आहे. समाजाचा पायाच आगदी खिळखिळा झाला आहे. भ्रष्टाचारामुळे लोक अगदी लाचार
झाले आहेत. व्यापारी जगात लाज मोठ्या प्रमाणात दिली व घेतली जाते. भ्रष्टाचार जसजसा वाढत गेला तसतसा त्याचा परिणाम वाईट होत गेला आहे. गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचारामुळे कित्येक राष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे भ्रष्टाचाराचा सर्वात जास्त त्रास गरिबांना सहन करावा लागतो.पण हा भ्रष्टाचार कधी थांबेल का? आज भ्रष्टाचार सर्वसामान्य का होत चालला आहे? पहिले कारण अनेकांच्या मते काम करुन घेण्याचा हा सोपा आणि एकमेव मार्ग असतो. दुसरे कारण म्हणजे त्यांना होणारी शिक्षा व दंड ते लाज देऊन टाळू शकतात. तिसरे कारण नेते, पोलिस,न्यायाधीश यांसारखे प्रतिष्ठित लोक भ्रष्टाचाराकडे दुलर्क्ष करतात. भ्रष्टाचारी लोक इतरांना होणाऱ्या त्रासाची पर्वा करत नाही कारण त्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. लोकांना कितीही पैसा कमावला तरी त्यांचे समाधान होत नाही. भ्रष्टाचारापासून भ्रूणहत्या, स्त्रियांचे लैंगिक शोषण, अत्याचाराविरूद्ध कायदे असूनही असे प्रकार घडतात ना? कारण अजूनही स्त्रिया भ्रष्टाचारावर आवाज उचलत नाही त्रास सहन करत बसतात.
स्त्रियांनी भ्रष्टाचारावर पाऊले उचलली पाहिजेत. स्त्रियांना न्याय मिळायलाच पाहिजे. कुठेतरी याला शासन जबाबदार आहे. कारण शासन भ्रष्टाचाराविषयी पाऊले उचलत नाही असच जर घडले तर भ्रष्टाचाराचा प्रश्न सुटणारच नाही. अजूनही काही गावात भ्रष्टाचार थांबलाच नाही कारण ते मुकाट्याने त्रास सहन करुन घेत आहेत. मुलांना अजूनही संरक्षणाची गरज आहे हे संरक्षण शासनाकडून मिळायला हवे. आज प्रत्येक नागरिकाने भ्रष्टाचाराविषयी पाऊले उचलावी. आपल्या भारताची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर आजपासून सर्वानी प्रतिज्ञा करावी की मला कितीही त्रास पडला कामाला कितीही वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही.
दुष्काळ
दुष्काळ म्हणजे पावसाची कमतरता.दुष्काळ आज आमच्यासमोर भीषण समस्या आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढारलेले आहे की कमीत-कमी पाऊस असणार्या प्रदेशातही पुरेशा पाण्याची तजवीज केली जाऊ शकते. भारतात नद्यांचे इतके विशाल जाळे पसरलेले आहे की देशातील कोरड्याहून कोरडे क्षेत्राला सुद्धा दुष्काळमुक्त करता येऊ शकते. दुष्काळ येण्यास वातावरणातील आकस्मिक बदल,वृक्षतोड, ज्वालामुखीचे उद्रेक, वणवे इत्यादी पर्यावरणातील जलचक्रातील कारणे असू शकतात. दुष्काळात अन्नपाण्याच्या अभावी माणसासह बहुसंख्य सजीवाना प्राणसंकटास तोंड द्यावे लागते. आपल्याकडे टंचाई अनेक प्रकारे जाणवू शकते.पाऊस न पडल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्यांचे शेतात नुकसान होत आहे पिके वाया जात आहेत. रोजगार मिळत नाही. आज ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबाच्या कुटुंबे गावच्या गाव स्थलांतरित होत आहेत. दुष्काळाने जीवन उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याच्यांजवळ एकच उपाय उरला आणि तो म्हणजे गळफास लावून आत्महत्या करणे. त्यांची मेहनत वाया जात आहे खूप गंभीर समस्या आहे.
पावसामुळे धरणे जरी भरली तरी आवश्यक तेवढे पाणी मिळतच नाही. पाणी टंचाईसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. भविष्यात भीषण अन्न टंचाईलाही सर्वानाच सामोरे जावे लागणार आहे. येणारा काळ भयावह असेल. दुष्काळी जनतेची होणारी ससेहोलपट टळावी, पशु-पक्ष्यांचे हाल होऊ नये तसेच अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा लागेल. पाणी हा विषय विज्ञान, तंत्रज्ञान, नियोजन आणि कृती यांच्याशी संबंधित आहे. शासनाने विविध पर्यायाचा अभ्यासपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. आज जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलपुनर्भरण,रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे नवे प्रकल्प राबवले जात आहेत. वृक्षसंर्वधनाने मानवाला पाणी लाभू शकते.यासाठी सर्वानी वृक्षतोड थांबवून अधिकाधिक झाडे लावण्यासाठी प्रयत्न करयला हवे. विकसित आणि अविकसित खैडयांमध्ये जलनियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजना राबवायला हव्यात.लहान लहान बंधारे बांधणे, नदी नाले यातील गाळ काढणे यांकडे लक्ष द्यायला हवे!
चला व्यसनमुक्त होऊ या!
व्यसन म्हटल की अगोदर आपल्या डोळ्यासमोर दारू,सिगारेट,तंबाखू खाणारा पुडी खाऊन नको तिथे पचकन थुंकण्याची प्रतिमा येते. पण व्यसन हे दारूचे असो की सिगारेटचे असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असो त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. शरीर हळूहळू कमकुवत होत जाते. आज दारु ही पुरुष, स्त्री, युवा पिढी तसेच वृद्ध यांना खूपच प्रिय झालेली आहे. खास करून युवा पिढीत दारूची विशेष वेळी सवय होते. नात्यातील जबाबदार आणि वाढत चाललेल्या अपेक्षा यामुळे आजची पिढी पूर्णपणे व्यसनधीन असल्याची प्रचिती जागोजागी येत आहे. मानसिक आधार कुठेच मिळत नाही मग ते व्यसनांच्या आहारी जातात. सिगारेट असे नको-नको ते मार्गाचा अवलंब करताना दिसून येतात. तरूण पिढी आजकाल व्यसनांच्या खूपच व्यसनाधीन होत चालली आहे. यामुळे देशाची प्रगती होईल का? महाराष्ट्र शासनाने व्यसन मुक्तीसाठी अनेक योजना राबवल्या पण नुसत्या योजना राबवून चालणार नाही तर त्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. दारुबंदीसाठी काही अफलातून उपाय आहेत. प्रत्येक व्यक्तीनी आपापल्या मनावर ताबा ठेवला आणि उपाय अवलंबले तर नक्कीच व्यसनमुक्ती होऊ शकते असे मला वाटते.
मूलभूत गरजा
अन्न,वस्त्र,निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत पण माणूस यावर समाधानी आहे का? या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती पैशाची!!! आणि हीच गरज सर्वात मोठी होऊन बसली आहे. खरच पैसे ही आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची गरज झाली आहे असेच प्रत्येकाला वाटू लागले. त्यासाठी नाती,प्रेम,आनंद आत्मिक समाधान मागे पडत चालले आहे. माणूस खरंच पैशाने सुखी होतो का??? माणसाला सुखी होण्यास गरज आहे समाधानाची प्रत्येक गोष्टीत समाधान असावे लागते.
सध्याच्या युगात भौतिक गरजा कितीही वाढल्या असल्या तरी क्षणिकच आहेत असे वाटते. मोबाईल, टीव्ही, वाहन, मनोरंजन साधने ही सर्व मानवाच्या सुखसोयीसाठी बनवली गेली आहेत. गरज ही शोधाची जननी आहे. आयुष्य सुखकर होण्यासाठी मानवाने विविध उपकरणे, तंत्रज्ञान, यंत्रे, वाहने इत्यादीचा शोध लावला. परंतु याशिवाय माणूस जगूच शकणार नाही. शहरात किती सुविधा उपलब्ध आहेत तरी मानव समाधानी नाही. आजही कित्येक खेडोपाडी साधी वीजही नाही बाकीतर विचारच करू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी त्यांना किती कष्ट करावे लागते .खरच त्यांना सुख-सुविधांची गरज आहे. अजूनही ते खूप गरीब आहेत त्यांना पाहिजे तशा सुविधा मिळाल्या नाहीत.
प्रदूषण
प्रदूषण म्हणजे घातक किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणार निचरा.प्रदूषण मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा,जल,मृदा अशा अनेक घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळण्याने पर्यावरण दूषित होते. मोठमोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या वाढल्याने लाकूड व दगडी कोळसा यांचा इंधन म्हणून वापर वाढला यांमुळे शहरे ओंगळ झाली. हायड्रोकार्बने,जड धातू, कीटकनाशके ,क्लोरिन, सांडपाणी, प्लास्टिक,मोकळ्या जागेवर फेकलेले अन्न, मलमूत्र, रसायने, तुटलेल्या वस्तूचे ढिगारे,इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी जैविक-अजैविक अवशिष्टामुळे प्रदूषणाच्या जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणात किरणोत्साराचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे. औद्योगिक वसाहती व कारखान्यातील रासायनिक पदार्थ कोणत्याही नदी/नाले/तलाव इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.नदीत कपडे धुणे,भांडी घासणे,पाण्यातील जीव मृत होऊन कुजणे,रासायनिक रंगकाम केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्तीच्या विसर्जनामुळे अशा अनेक कारणांमुळे प्रदूषण होत आहे याला जबाबदार मानव आहे.
प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना
1. सेंद्रिय शेतीचा वापर करणे, रासायनिक खते कीटकनाशके मर्यादित प्रमाणात वापरणे.
2. शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरुन सणांचा आनंद लुटणे,जलप्रदूषण करणे टाळणे.
3. कारखान्याचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.
4. अशुद्ध पाण्याची निर्मिती कमीत कमी प्रमाणात कशी होईल याची काळजी घेणे.
5. पाणी उकळून आणि त्यामध्ये तुरटी फिरवून पाणी पिणे.
6. घरगुती अशुद्ध पाणी योग्य प्रक्रिया करून नदीमध्ये सोडणे.
मोबाईल टॉवर
मोबाईल टॉवर ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोबाईल फोनचे तंत्रज्ञान आल्यापासून चर्चा होत असली तरी त्याचे उत्तर अद्याप हाती आलेले नाही. मोबाईल लहरीमधून येणार्या लहरी आरोग्याला घातक असतात. मोबाईलच्या टॉवरद्वारे मानव आणि प्राण्यांवर दुष्परिणाम होत आहेत. चिमण्या, कावळे यांची संख्या कमी झाली आहे. टॉवरमधून उत्सर्जित होणारी उष्णता ही आरोग्यासाठी घातक आहे. 200 मीटरपर्यंत राहणार्या डोकेदुखी, हृदयरोगाची समस्या, अस्वस्थता अशा अनेक त्रासांचा धोका असतो. पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे प्रदूषण वाढले आहे. केंद्राच्या समितीने दवाखाने, मैदाने, शिक्षणसंस्था व अन्य गर्दीच्या ठिकाणावर मोबाईल टॉवर लावण्याबाबत निर्बंध घालण्याची शिफारस केली. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी पावले उचलणे ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही सगळे आमच्या परीने प्रयत्न करत आहेत.
वृक्ष
दवृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणार निसर्गाच देण म्हणजे वृक्ष. वृक्षाचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान, छाया याच्यांत एक अतूट नाते आहे. विविध वृक्ष जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणारे हे वृक्ष कोणत्याही अपेक्षेचे भान ठेवणारे पण भरभरून सर्वस्व देणारेच आहेत.वृक्ष त्यांचे अन्न जमिनीतून व श्वसन वातावरणातून घेतात. जमीन व अवकाश यांच्यात उभा असलेला वृक्षदेह मात्र मानव व सर्व सजीवांसाठी उपयोगी पडतो. वृक्ष मानवाला अनेक प्रकारे उपयोगी पडतात.वृक्षापासून पाने, फळे, फुले तर मिळतातच पण जळाऊ सरपण, काठी असंख्य प्रकारे मानवाने वृक्षांचा जीवनात उपयोग केला आहे. निसर्गाच्या सर्व मोसमांशी ऋतूमानांशी हे वृक्ष सतत संघर्ष करत जगत असतात. वृक्ष रासायनिक औषधे, सुगंधी द्रव्ये, तेल, रस, खत इत्यादी देणारे एक समृद्ध भांडारच आहे निसर्गाची आज दुर्दैवाने होणारी वृक्ष-तोड ढासळलेला पर्यावरणाचा तोल याला जबाबदार मानव आहे. आज दिवसेंदिवस लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे लोकांना राहण्यासाठी जागेची कमतरता भासते त्यामुळे घरासाठी लाकूड हवे. वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी आजूबाजूची रस्त्यालगतची वर्षानुवर्षांची झाडे आपण तोडुन टाकतो. पुरातन काळात वसुंधरेवर प्रचंड जंगले होती. घनदाट वृक्षराजीने सर्व जग व्यापले होते कालांतराने भूपृष्ठावर भूकंपसारखे प्रचंड उत्पात होऊन वृक्ष जमिनीत गाडली गेली. वनक्षेत्र खूप कमी झाले आहे ही चिंताजनक बाब आहे. अनेक अरण्ये नष्ट झाली, पर्जन्यमान घटले,जमिनीची धूप थांबली,जमिनीचे वाळवंटात रूपांतर होऊ लागल, दुष्काळ पडू लागला.
मानवाने आपल्या पायावर आपणच कुर्हाड मारुन घेतली.2007 साली महाराष्ट्र वृक्ष दिन साजरा करण्यात येऊ लागला. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी झाडे लावली पाहिजेत.वृक्षाचे महत्व खेड्यापाड्यातील लोकांना पटवून दिले पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम राबवली पाहिजे. एक माणसाला एक दिवसाचे जीवन जगण्यासाकरिता 15 किलो आॅक्सिजन लागतो. 15 किलो आॅक्सिजन तयार करण्यासाठी किमान 7 झाडे लागतात. मानवाच्या पुढील भविष्यासाठी वृक्ष लावणे गरजेचे आहे नाहीतर त्यांना आॅक्सिजन मिळणार नाही.
Sunday, September 8, 2019
विज्ञान
आपल्या सर्व गरजा पुरवणारी विविध रहस्य उलगडणारी चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान. आपल्या भोवतालचा अज्ञानाचा अंधार विज्ञानाने जादूच्या कांडीप्रमाणे दूर केला. विज्ञानाने मानवी जीवनाला अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले.चाकाच्या शोधानंतर मानवी जीवनाला गती मिळाली. अनेक ठिकाणी कामे सुलभ झाले. वेळ लांबवणारी कामे क्षणार्धात होऊन वेळेची बचत होऊ लागली. मनुष्याला नवी माहिती मिळते. नव्या तंत्राचा विकास होतो. नवे प्रश्न, नव्या शंका निर्माण होतात आणि विज्ञानचे चक्र सातत्याने सुरू राहते. मानवाने भूमीप्रमाणे सागरावर आणि आंतरिक्षावरही स्वामित्व मिळवले आहे. विज्ञान फक्त आपल्या गरजा पूर्ण करु शकते.विज्ञानाने शोधलेल्या यंत्रानी कष्टाचे महत्व नाहीसे झाले. स्वयंपाकापासून खेळापर्यत उदयोगापासून प्रगतीपर्यत सर्व गोष्टी जलद व सुलभरितीने करण्याचे तंत्र विज्ञानाने दिले. मनुष्याचे आयुष्य सुखकर बनवण्यासाठी नव-नव्या वस्तू बाजारात येतात त्याला तंत्रज्ञान जबाबदार असते. वेगवान संगणक, आयफोन, विमान कर,कॅसरशी सामना करणारे औषधे/उपचार हे सर्व तंत्रज्ञान विकासाची फळे आहेत. विज्ञान म्हणजे केवळ ज्ञान नव्हे तर जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. विज्ञानामुळेच मनुष्य चंद्रावर पोहोचला आहे. आरोग्य, शिक्षण, औद्योगिकीकरण सर्व क्षेत्रात क्रांती घडून आली आहे. विज्ञानामुळे दळणवळण, तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात प्रगती झाली आहे. जगभराची माहिती विज्ञानमुळे घरोघरी एक मिनिटात पोहोचते.विज्ञान मानवी जीवनाला मिळालेले वरदान आहे. विज्ञानाने बरेच काही साध्य केले आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये अजून आणि अधिक मिळविण्याचे आश्वासन दिले आहे. अवकाश संशोधनात आणि तंत्रज्ञानात भारत आता आघाडीचा देश आहे. लाॅच, टेक्नॉलॉजी ते उपग्रहची रचना तयार करणे, त्याचा वापर सर्व क्षेत्रात भारताने प्राविण्य मिळविले आहे. संपर्क ,प्रसारण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, टेलिमेडिसीन इत्यादी क्षेत्रात भारताने उपग्रहाचा नेमका वापर केला आहे.
स्त्रियांची प्रसार माध्यमातील भूमिका
सर्व प्रसार माध्यमे तंत्र दिवसेंदिवस विकासित होत आहेत. माध्यमचा उपयोग अधिकधिक लोक करीत आहेत. त्यात स्त्रियांचा हिस्सा मोठा आहे. सर्व प्रसार माध्यमांत लोकांवर प्रभाव पाडणारे माध्यम म्हणजे सिनेमा. स्त्रिया बाहेर पडल्या कलाक्षेत्रात चमकू लागल्या परंतु कुठेही त्याच्यातल्या दुय्यम भूमिकेचे त्यांचे इतरांचे भान सुटत नाही. विकसित होत जाणाऱ्या प्रसार माध्यमांतून स्त्रीची प्रतिमा, व्यक्तीमत्व विकसित होणे दूरच उलट एक मालकीची वस्तू म्हणून तिचे जाहिररित्या प्रगटीकरण केले जाते.
स्त्रियांची प्रसार माध्यमांत खरंच खूपच प्रगती केली आहे. प्रत्येक सिनेमा ,सिरियल सगळ्यांमध्ये स्त्रीयांचे स्थान जास्त दिसून येते. चित्रपटात एखादी स्त्री साडी घालून खूप दागिने घालून नटलेली असे वर्णन केले जाते.बहुतेक अॅडसमध्ये स्त्रीयांचे स्थान मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे स्त्रीयांना स्वतंत्र मिळाले आहे पण दुसरीकडे खेडेगावात त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही त्यांचे घरचे त्यांना प्रोत्साहन देत नाही. स्त्रियांना खेडेगावात कमी दर्जा दिला जातो. स्त्रियांनी बाहेर पडायचे नाही त्यांनी चूल-मूल इतकाच संसार सांभाळायचा अशी गावाच्या लोकांची समज आहे. स्त्रिया प्रगती करत असतील तर त्यांच्यावर बंधने आणली जातात.
स्त्रियांनी प्रसार माध्यमांत प्रगती केली तर त्यांना समाज वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असतो. स्त्रियांना नको-नको ते बोलले जाते. त्यांनी जर फॅशनचे कपडे घातले तर पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. स्त्रियांना किती त्रास सहन करावा लागतो. जुन्या काळातील लोकांचे विचार बदलायला हवे. स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे त्यांना जर स्वतंत्र दिले तर खूप प्रगती करू शकतात. एखादी गावातील स्त्री जर शिक्षित झाली तर तिला तुच्छ लेखले जाते हा लोकांचा समज दूर केला पाहिजे. स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे संधी मिळाली पाहिजे.
शहराकडे स्त्रीयांना सगळया सुविधा उपलब्ध आहेत गावाकडे सुविधा नसताना त्या प्रगती करून पुढे आल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. स्त्रियांकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारखे आहेत. स्त्रियांनी सिद्ध करून दाखविले आहे की आम्ही पण करू शकतो. स्त्रियांमुळे देशाचा विकास होऊ लागला आहे. बेटी बचावो,बेटी पढावो ही मोहीम प्रत्येक घरात राबवली पाहिजे.